अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

0

जळगाव । दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका इसमाच्या जळगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांनी संशयित आरोपीकडून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांना बुधवार (दि.22) रोजी गोपनीय माहिती मिळाली की, बिग बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोस्ती बिअर शॉपसमोर एक संशयित इसम विनापरवाना पिस्तूल बाळगून आहे.

त्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तात्काळ सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या व्यक्तीने चौकशीत आपले नाव हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर, जळगाव) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल (सिल्व्हर रंगाचे, मॅगझीनसह) किंमत अंदाजे १५,००० रुपये, जिवंत काडतूस किंमत अंदाजे ५०० रुपये अवैध शस्त्र आढळले. याप्रकरणी पोलिसांनी १५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल अमोल अशोक ठाकूर यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६६/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिपक सुरवळकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.