दुर्देवी! पाच वर्षीय मुलासह आई, मावशीचा तापीतील डोहात बुडून मृत्यू

0

जळगाव : तापी नदीवर अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलासह आई आणि मावशीचा तापीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंजाळे (ता. यावल) येथील घाणेकर नगरमध्ये बादल लहू भील यांच्या घरी खंडोबाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी त्यांची मावस बहिण वैशाली सतीश भील (रा. अंतुर्ली, ता. अमळनेर), मामे बहिण सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव) आणि इतर नातेवाईक आले होते.

सोमवार (दि.14) रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास वैशाली, तिचा मुलगा नकुल (वय 5) व सपना सोनवणे तापी नदीवर आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले. यादरम्यान, नकुलचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी आई वैशाली व मावशी सपना यांनी देखील पाण्यात उडी घेतली, मात्र पोहता न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले.

सोबत असलेल्या अनु सतीश भील या बालिकेने धावत जाऊन ही माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक तरुणांनी शोध घेत त्यांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत आई वैशाली सतीश भील, तिचा मुलगा नकुल व मावशी सपना गोपाळ सोनवणे या तिघांचा मृत्यू झाला असून यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.