राजकीय वादातून गोळ्या घालून तरुणाची हत्या
चाळीसगाव । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील बोढरे शिवारात आढळलेल्या मृतदेहाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख जगदीश झुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. शिंदखेडा, जि. धुळे), अशी झाली असून त्याची गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान मयताची पत्नी अरुणा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आलीय. त्यांच्या तक्रारीनुसार, २९ जून रोजी अशोक मगन मराठे, शुभम संभाजी सावंत आणि एक अनोळखी २४ वर्षीय तरुण (सर्व रा. मोरदड, ता. जि. धुळे) यांनी जगदीशला मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून घरातून सोबत नेले. मात्र, त्यानंतर जगदीश घरी परतलेच नाहीत.
पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असता, जगदीशचा जुन्या राजकीय वादातून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. खुनानंतर आरोपींनी जगदीशच्या मृतदेहाची चाळीसगाव ते कन्नड घाटात विल्हेवाट लावली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, तिन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय वैमनस्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. एका तरुणाचा अशा प्रकारे खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.