अट्टल गुन्हेगारासह साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; दोन गावठी पिस्तूल, ८ तलवारी जप्त
जळगाव : जिल्हापेठ पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. रामानंदनगरमधील खुनाच्या गुन्ह्यात हवा असलेला ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपी धनंजय उर्फ धिरज कोळी याला पोलिसांनी आर. आर. शाळेजवळील गल्लीत भरदिवसा झडप घालून पकडले. त्याच्याकडून २ चांदीच्या रंगाचे गावठी पिस्तूल आणि तब्बल ८ धारदार तलवारी असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल वाघ यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. रामानंदनगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या (BNS १०३(१)) गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार धिरज कोळी हा शहरात फिरत असल्याची खात्रीशीर खबर मिळताच, वाघ यांनी तातडीने पथक तयार केले.’


जिल्हापेठचे पथक पेट्रोलिंगवर असताना आर. आर. शाळेच्या बाजूच्या गल्लीत एक संशयित मोटारसायकल एम एच 19 ए झेंड 2412 दिसून आली. पोलिसांनी या दुचाकीला घेरले आणि धिरज कोळी व त्याचा साथीदार अजय मारुती डोळे (रा. नेरी दिगर) यांना ताब्यात घेतले. दुचाकीची झडती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला. दुचाकीच्या पेट्रोल टाकीखाली इंजिनजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत गावठी कट्टा लपवून ठेवला होता, तर बाजूला बांधलेल्या पोतडीत तलवार मिळून आली.
आरोपींना न्यायालयात हजर करून ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळवल्यानंतर सपोनि अनिल वाघ आणि उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांनी त्यांची ‘खाकी’ स्टाईलने चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी अधिक शस्त्रे लपवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ८ तलवारी आणि २ पिस्तूल असा १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींचा गुन्हेगारी आलेख मोठा
धिरज कोळी (वय २०): याच्यावर धरणगाव आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि आर्म ऍक्टचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो एका खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. अजय डोळे (वय २३): याच्यावर नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.