घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव । औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शहरातील लक्ष्मी नगर परिसरात घरफोडी करून संसारोपयोगी सामान चोरून नेणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. राजेंद्र दुसाने यांच्या घरातील एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, तांबे-पितळी भांडी यासह इतर संसारोपयोगी वस्तू चोरीला गेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले होते.
दरम्यान, दुसाने यांनी दिलेल्या तक्रारीनंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी अंमलदारांचे एक पथक नेमले होते.


गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने लक्ष्मी नगर परिसरात सापळा रचून संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एका अल्पवयीन मुलासह चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच संशयित आरोपी राहुल चौधरी यालाही ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली. शहरात चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत असताना, पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.