राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगालची विजयी घौडदौड
जळगाव । अनुभूती निवासी स्कूल, जळगाव येथे आयोजित सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये पश्चिम बंगाल संघाने एकतर्फी अंतिम सामन्यात केरळचा ८२ धावांनी पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. गुरुवारी झालेल्या या निर्णायक सामन्याने संपूर्ण स्पर्धेचा थरार शिगेला पोहोचला. महाराष्ट्राने तिसऱ्या क्रमांकासाठी तामिळनाडूवर मात करत सन्मानजनक स्थान पटकावले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो त्यांच्या अंगलट आला. पश्चिम बंगालच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत २० षटकांत फक्त ४ गडी गमावत १६६ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात केरळ संघाचे फलंदाज बंगालच्या काटेकोर गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाहीत. केरळने ९ गडी गमावत फक्त ८४ धावा केल्या आणि बंगालने ८२ धावांनी सहज विजय मिळवला. अंतिम सामन्यात “मॅन ऑफ द मॅच” पुरस्कार दिपन्कन दासगुप्ता (पश्चिम बंगाल) यांना मिळाला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडूचा २९ धावांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून आदर्श गव्हाणे याने ३२ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी करत शानदार योगदान दिले. रणवीरने देखील ४० धावांची दमदार साथ दिली. प्रत्युत्तरात तामिळनाडूचा संघ १२ षटकांत ८ गडी गमावून ९४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
स्पर्धेत एकूण २६० खेळाडूंनी सहभाग घेतला. तीन मैदानांवर एकूण १९ सामने खेळले गेले. स्पर्धेत देशातील विविध राज्यांसह दुबईचा संघ देखील सहभागी झाला होता. संपूर्ण स्पर्धेत तब्बल ३८३७ धावा, २०५ बळी, ७२ षटकार आणि ८ अर्धशतकांची नोंद झाली. खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करून विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्राचा आदर्श गव्हाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज, केरळचा नवीन पॉल प्लेअर ऑफ द सिरीज व सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक, पश्चिम बंगालचा आर्यन सिंग सर्वोत्तम गोलंदाज, तामिळनाडूचा तरुण कुमार सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी यांच्यासह प्रशिक्षक आणि आयोजकांनी मोलाची भूमिका बजावली. पारितोषिक वितरण समारंभात अतुल जैन यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे कौतुक करत खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगाल संघाला सुवर्ण पदके तर उपविजेता केरळ संघाला रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले.
या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमुळे जळगावच्या अनुभूती स्कूलला एक राष्ट्रीय ओळख मिळाली असून, भविष्यातील अशा आणखी स्पर्धांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरणार आहे.