मुंबई | राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांच्याविरोधात अटक वॅारंट जारी करण्यात आले आहे. धनादेश न वटल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी केला आहे. त्यामुळे देशमुखांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने रणजीत देशमुख यांच्यासह तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी करण्यात आले आहे. याचिकाकर्ते अतुल देवगडे यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. ११ लाख रुपयांचे ५ धनादेश देवगडे यांना देण्यात आले होते, त्यापैकी एकही धनादेश वठला नाही.


धनादेश अनादर प्रकरणात अतुल प्रभाकर देवगडे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, परसेप्ट वेब सोल्यूशन प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी संगणक, इंटरनेट आणि वेबसंदर्भातील साहित्य खरेदी केले होते. रणजित देशमुख, पल्लवी पारेख आणि अमित धुपे हे या कंपनीचे संचालक आहेत. कंपनीने ११,५०,००० रुपयंचे ५ धनादेश दिले. यातील एकही धनादेश वठला नाही.
वारंवार पाठपुरावा करून आणि कायदेशीर नोटीस पाठवूनही उत्तर मिळत नाही त्यामुळे अतुल देवगडेंनी न्यायालयात धाव घेतली. तिघांनी देखील जामीन घेतला. पण या प्रकरणी खटला सुरू करण्यापूर्वी तिघांनी न्यायालयात हजर राहणे गरजेचे होते. ते या प्रकरणी न्यायालयात हजेरी लावत नसल्यामुळे न्यायालयाने तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी केले. त्यामुळे रणजित देशमुख यांच्या अडचणी वाढल्यात.