एकनाथ खडसेंच्या जळगावतील निवासस्थानी जबरी चोरी

0

जळगाव । जळगावमधून एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाली आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तर मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरकामगार साफसफा करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. सहा ते सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
दरम्यान या घरफोडी प्रकरणी एकनाथ खडसे म्हणाले की, रात्री घरफोडी झालेली आहे. बंगल्यातील सर्व रूमचे कुलुपं तोडून चोरी केलेली आहे. काही सामानाची चोरी झाली आहे. माझ्या रूममध्ये 35 हजार रुपये होते. पाच-पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या. त्या चोरीला गेलेल्या आहे. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत आहेत. दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. काहीतरी वेगळाच अर्थ करतात. घटनेचे गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.