रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला

0

चाळीसगाव । जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील तरवाडे बुद्रुक गावातून एक ९ वर्षांची मुलगी रहस्यमय पद्धतीने गायब झाली होती. तब्बल चार दिवसांनी गावाशेजारील एका विहिरीत ती मृतावस्थेत आढळली आहे. या घटनेमुळे तरवाडे गावात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे शुक्रवारी शाळेतून घरी येताना ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे रहस्यमयपणे गायब झाली होती. तिचा मृतदेह अखेर गावाशेजारील एका विहिरीत तब्बल चार दिवसांनी आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय बळावला होता. दरम्यान, आज गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास एलसीबी व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 60 ते 70 तासांहून अधिक काळ चाललेल्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.