महाराष्ट्रात ‘शक्ती चक्रीवादळ’ धडकणार ; या भागाला हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. यादरम्यान अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. आता अशातच संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळात आज अधिक तीव्र रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला असून, ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक असणार आहे.


चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने सरकारकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बोटींना बंदरातच थांबण्याचं सांगितलं असून जे समुद्रात आहेत त्यांना तात्काळ मागे परत येण्याचं सांगितलं आहे. तसंच किनारपट्टीवरील रहिवाशांना सावधानेचा इशारा दिला आहे. भरतीमुळे पाणी साचू शकतं, अशात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान खात्याने किनारपट्टीच्या भागांव्यतिरिक्त, महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर कोकणात सखल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पूरस्थितीमुळे जनजीवन विस्तळीत होण्याची शक्यता पाहता राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांना संभाव्य आपत्कालीन स्थितीत तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील आजपासून ८ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जळगाव शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान किरकोळ आणि ढगाळ वातावरणासह दुपारनंतर हलक्या ते मध्यम पाऊस होईल. तर काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे काढणीवर आलेल्या पिकांना फटका बसल्याची शक्यता असून यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.