CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच सोमवारी अचानक बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
यंदा सीबीएसई बोर्डातील सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यातील 87.98 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत 0.65 टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्क्यांनी चांगला लागला आहे. यावर्षी 91.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 85.12 टक्के मुलं पास झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.