आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारने घेतले ४ महत्वाचे निर्णय

0

मुंबई : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. आजच्या कॅबिनेट बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, तसेच मताचाही अधिकार आहे.

राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे

ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी २.०, सरपंच संवाद कार्यक्रम
ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर विकासाभिमुख कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम २.० व राज्यातील सरपंचांच्या क्षमता विकसित करण्यासाठी सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार
राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये जागा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार
नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.