भुसावळमधील २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा पोलिसांकडून पर्दाफाश
जळगाव । काही दिवसापूर्वी भुसावळ शहरात २५ लाख ४२ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या लुटीच्या गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तक्रारदार ज्या खासगी कंपनीत नोकरी करतात, त्याच कंपनीचा चालक हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी चालक शाहीद बेग (२५, रा. भुसावळ) याच्यासह एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी सुमारे २३ लाख ४२ हजार रुपये तसेच तीन भ्रमणध्वनी हस्तगत करण्यात आले आहेत.
काय होती घटना?
मंगळवारी रात्री १०:२० वाजता तक्रारदार मोहम्मद यासीन हे त्यांच्या कार्यालयातील २५ लाख ४२ हजार रुपये रक्कम एका बॅगेत घेऊन दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, खडके शिवारातील सत्यसाईनगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी चालत्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे मोहम्मद यासीन यांचा तोल गेल्यानंतर संशयितांनी त्यांच्याजवळील पैशांची बॅग बळजबरीने हिसकावली. अंधाराचा फायदा घेऊन सर्वजण दुचाकींवर पळून गेले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात तक्रारदाराच्या कंपनीचा चालक शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. प्रत्यक्षात, पोलिसांच्या चौकशीत चालक शाहीद बेग यानेच लुटीच्या गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली.
ताब्यातील संशयितांकडून लुटीच्या रकमेपैकी २३ लाख ४२ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित दोन लाख रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यासह गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संशयितांना तीन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदरचा गुन्ह्याचा तपास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत. संशयितांपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. चालक बेग याच्यावर मलकापूर शहरासह बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.