मोठी बातमी : राज्यात 14 ठिकाणी भाजप अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली
मुंबई । राज्यातील एकूण २९ महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. काही इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर अनेक पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपावरून भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली.
काही महानगरपालिकांमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. तर काही ठिकाणी शिंदे गटाने युती करण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थिती लक्षात घेता दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 14 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातील युती तुटली आहे.


या १४ महापालिकेत युती तुटली?
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये तिरंगी किंवा बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
जरी 14 ठिकाणी महायुती तुटली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये युती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना युतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे वेगळी असणार आहेत.