जळगावातील माजी महापौरांसह अनेक नगरसेवक करणार भाजपात प्रवेश
जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार मात्र त्यापूर्वी भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झाली आहे. यातच जळगाव शहर महानगरपालिकेत भाजपची ताकद वाढणार आहे. माजी महापौर नितीन लढ्ढासह माजी महापौर जयश्री महाजन आणि अनेक नगरसेवक आज शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करणार आहे.


जळगाव महानगर पालिकेवर भाजपाला एक हाती सत्ता हवी असल्याने भाजप विविध प्रकारचे ऑपरेशन करीत आहेत. महापौर पदाच्या कार्यकाळात नितीन लढ्ढा यांनी मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना दिली होती. त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर असून त्याचा भाजपाला फायदा होवू शकतो. आज सायंकाळी 4 वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होवू घातला आहे. नितीन लढ्ढा यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
यांचा होणार प्रवेश
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जी.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आबा कापसे, प्रतिभा कापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, नवनाथ दारकुंडे, जाकीर पठाण, फिरोज पठाण आदींसह उबाठा गटाचे माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दै. लोकशाहीला दिली.