भुसावळमध्ये मंत्री सावकारेंच्या पत्नीचा पराभव

0

भुसावळ । भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारत मंत्री संजय सावकारेंसह भाजपला मोठा धक्का दिला आहे. शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे यांचा विजय झाला आहे. त्यांनी मंत्री सावकारेंची पत्नी रजनीताई सावकारे यांचा पराभव केला.

भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत यंदा जबरदस्त लढत झाली. लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे एससी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना भाजपने उमेदवारी दिली. यावरून विरोधकांनी टिका केली. विरोधकांच्या माध्यमातून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स लागला होता. यात माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी लेवा पाटीदार समाजाची सून असलेल्या गायत्री भंगाळे-गौर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

दरम्यान आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये रजनी सावकारे यांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय होणार असल्याचे मानले जात होते. मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये गायत्री भंगाळे यांनी जोरदार कमबॅक केले. शेवटी तर अतिशय अटीतटीची चुरस निर्माण झाली. यातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी 627 मतांनी विजय संपादन केला.

या अनपेक्षीत पराभवामुळे मंत्री संजय सावकारे यांना जबर धक्का बसला असून माजी आमदार संतोष चौधरी यांनी तब्बल नऊ वर्षानंतर कमबॅक केले आहे. हा पराभव भुसावळच्या राजकारणाची आगामी दिशा दर्शविणारा ठरू शकतो असे मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.