भुसावळ हादरले ! जावयाकडून मामे सासऱ्याची हत्या
भुसावळ । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात असलेल्या अयान कॉलनी माम सासरा-जावाई यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी जावयाच्या हल्ल्यात मामे सासऱ्याचा मृत्यू झाला. तर सख्खा सासरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेख समद शेख ईस्माईल (40, कंडारी) असे मयताचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून दोन परिवारात वाद निस्तरण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सासरा व जावई व नातेवाईक खडका रोडवरील अयान कॉलनीतील जावयाच्या घरात जमले मात्र शाब्दीक वाद गुद्द्यांवर पोहोचला व याचवेळी चाकू तसेच फरशीचा वापर झाल्याने शेख समद शेख ईस्माईल (40, कंडारी) यांच्या छातीवर चाकूचा घाव वर्मी बसला तसेच जावई शेख सुभान शेख भिकन (अयान कॉलनी, भुसावळ) व सासरा शेख जमील शेख शकील (धुळे) यांनादेखील मारहाण झाल्याने तसेच चाकू लागल्याने ते जखमी झाले.


यात मामे सासऱ्यांना ग्रामीण रुग्णालय व तेथून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत शेख शुभान व त्याचे सासरे शेख जमील शेख शकील हे जखमी झाले आहे. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे डीवायएसपी गावीत यांनी सांगितले.