भुसावळ येथील गोळीबार घटना; चौथा आरोपी अटकेत – गृह राज्यमंत्री पंकज भोयर
मुंबई | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे १७ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या गोळीबार घटनेतील चौथ्या आरोपीस अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी याविषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.


गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, भुसावळ येथील जळगाव नाका परिसरात युवकांना धमकावून पैसे व दागिने मागण्याच्या प्रकारातून गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. त्यानंतर बाल न्याय मंडळ, जळगाव यांनी त्यांना मुक्त केले. या घटनेतील चौथा आरोपी फरार होता. मात्र त्यालाही अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
परवान्याशिवाय शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, या घटनेतील आरोपीला पिस्तूल कुठून मिळाले याचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच भुसावळ शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येते आहे. डायल ११२ सेवा आणि दामिनी बीट पेट्रोलिंगद्वारे नागरिकांना तत्काळ मदत दिली जात असल्याचे गृह राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.