भुसावळ येथील महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याची ८० लाख रूपयांत फसवणूक

0

भुसावळ । सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करूनही अनेक जण सायबर ठगांच्या जाळ्यात अडकत आहेत. अशातच मनी लाँड्रींग, दहशतवादी कारवायांसाठी तुमच्या बँक खात्यांचा वापर झाल्याची भीती दाखवून सायबर भामट्याने भुसावळ येथील महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८० लाख रूपयांत गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

भुसावळ येथील महावितरण कंपनीतून निवृत्त झालेले अधिकारी सुखदेव चौधरी (८६ ) यांच्या भ्रमणध्वनीवर २७ ऑक्टोबरला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. त्यावरून बोलताना भामट्याने आम्ही डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत आहोत, असे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने तुमचा फोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जोडून देत असल्याची बतावणी केली. याशिवाय, सायबर भामट्याने आपण कुलाबा येथून पोलीस अधिकारी विजय त्रिपाठी बोलत असल्याचे सांगितले. भ्रमणध्वनी क्रमांकावरून अनेकांची फसवणूक झाल्याने पोलिसांत तुमच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची भीती चौधरी यांना दाखवली.

अंधेरी ईस्ट येथील कॅनरा बँक खात्यावरून आतंकवादी संघटनांनी तुमच्या बँक खात्यात व्यवहार केल्याचे दस्तऐवज व्हॉटस्अॅपवर पाठवले. संबधितांनी सुखदेव चौधरी यांना धमकावून हा प्रकार अगदी कुटुंबातही कोणाला सांगायचा नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेतले. चौधरी यांनी पत्र पाठवल्यावर न केलेल्या गुन्ह्याचा लेखी कबुलनामा मुंबई पोलीस मुख्यालय, असा शिक्का मारुन ते त्यांना परत व्हॉटस्अॅपवर पाठवले. अब्दुल सलाम नावाच्या संशयिताने तुमच्या बँक खात्यात रक्कम टाकलेली आहे. तुमच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे, म्हणून दर दोन तासांनी तुम्ही ‘बोथ आर सेफ, जयहिंद !’ हा मेसेज आम्हाला पाठवा, असे सांगितले.

मनी लाँड्रींगमध्ये तुमचे खाते वापरले आहे. त्यानंतर दहशतवादी कारवायांत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले असल्याचे सांगत दहशतवादींसोबत तुमचा संबंध आहे, असा फोन चौधरी यांना सायबर भामट्याने केला. त्यांना तुमच्या खात्यात किती रक्कम आहे, असेही विचारले. त्यावर चौधरी यांनी त्यांच्या बँक खात्यात सुमारे ८० लाख रुपये असल्याचे सांगून टाकले. त्यावर सायबर भामट्याने बँकेतील सर्व रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यात टाकण्यास सांगितले. रकमेची पडताळणी करुन तुम्हाला ती परत दिली जाईल, असेही सांगितले. त्यानंतर संबधित सायबर गुन्हेगारांनी चौधरी यांना भारतीय रिझर्व बँकेचा सही शिक्का असलेले पत्र पाठवले. पैसे दिल्यानंतर मात्र त्यांचे फोन बंद झाले.

सायबर भामट्याने हडपलेले सुमारे ८० लाख रूपये परत मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त अधिकारी सुखदेव चौधरी यांनी जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांनी सतर्क राहावे. आपल्या बँक खात्यांची कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. कोणी तसा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.