अखेर छगन भुजबळांना मंत्रिपद, ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारणार?

0

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवारी, 20 मे) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्याने हे खाते रिक्त होते. या खात्यावर छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सकाळी 10 वाजता राजभवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले खाते भुजबळांना दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी भूजबळांव्यतिरिक्त आणखी कोणाला संधी मिळणार का याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाले. त्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. मुंडेच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि त्यांना धनंजय मुंडेंची खाती मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून मंगळवारच्या शपथविधी सोहळ्याबाबतचे पत्रक माध्यमांना पाठवण्यात आले आहे. नेमकं कोण शपथ घेणार याचा उल्लेख पत्रकात नसला तरी भुजबळांना मंत्रिपद मिळणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.