स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न ! डॉ. मोहन भागवत, वळसे घेण्यापेक्षा थेट नरेंद्र मोदींनाच सांगा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकमहोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या निमित्ताने अनेक ठिकाणी व्याख्याने, प्रवचने देऊन जनजागृती करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अनेक गोष्टी ते सांगताहेत आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात लोकांमधील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. या प्रश्नांमध्ये, व्याख्यानांच्या समयी अभिनेते सलमान खान आणि अन्य मान्यवरांना पाचारण करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हा अनुसूचित जाती जमाती चा व्यक्ती होऊ शकतो हेही सांगायला त्यांनी कमी केलेले नाही. ही चांगली गोष्ट आहे.
बोलण्याच्या ओघात डॉ. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताब दिल्यास त्या किताबाचा दर्जा उंचावेल, उंची वाढेल, असेही माध्यमांसमोर त्यांनी सांगितले आहे. मी काही भारतरत्न, पद्म पुरस्कार निवड समितीत नाही, परंतु या समिती सदस्याला हे आवर्जून सांगेन असे त्यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान, विश्वगुरु म्हणवले जाणारे आणि मातोश्री हिराबा यांच्या देहावसानानंतर मी ‘नॉन बायोलॉजिकल’ असल्याचा साक्षात्कार झालेले प्रात:स्मरणीय नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे घनिष्ठ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. कारण अयोध्येतील श्रीराम जन्मभूमिवरील प्रभू रामलल्लाच्या भव्य दिव्य मंदिराच्या शीलान्यास तसेच मंदिराच्या लोकार्पण सोहोळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समीप बसले होते. या दोन्ही सोहोळ्यांमध्ये पंतप्रधानांबरोबर सहभागी झालेले विविध उच्च पदस्थ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच असल्याचे मानण्यात येतात. मग ते आनंदीबेन पटेल असोत, योगी आदित्यनाथ असोत की वजूभाई वाळा असोत. हे सारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून पुढे आलेले आहेत.


मग स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी डॉ. मोहन भागवत यांनी इकडे तिकडे वळसे घेण्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानी घालायला हरकत नसावी. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. मोहन भागवत यांना भारताचे राष्ट्रपती करण्यात यावे अशी कळकळीची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या माध्यमातून शिवसेनेतून एक (नाथ) गट बाहेर काढण्यात येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथविण्याची, लोकशाहीचा गळा घोटणारी खतरनाक खेळी खेळण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांना हे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी ज्या पक्षाने आणि ज्या परिवाराने आपल्याला गगनभरारी घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्या पक्ष आणि परिवाराला तोडण्याची कारवाई करतांना काहीच कसे वाटले नाही, अशा शब्दांत संबंधितांची कानउघाडणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
डॉ. मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध असल्याचेच हे द्योतक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न किताब मिळावा ही जनमानसाची भावना डॉ. मोहन भागवत यांनी आवर्जून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानी घालावयास हवी. अर्थात सकाळ पासून रात्रीपर्यंत अहोरात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाची जपमाळ ओढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ही मागणी प्रत्यक्षात आणणे परवडणारे नाही. याचे कारण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व भारतीय जनता पक्ष तसेच त्यांच्या तथाकथित मित्रपक्षांना पचनी पडेल असे वाटत नाही. याचे महत्वाचे उदाहरण अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना घडलेल्या घटनेतून दिसून येते.
डॉ. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती, डॉ. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी रेखाटलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. या प्रसंगी सावरकर यांचे सुपुत्र विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यात अडचणी निर्माण करण्यात आल्या परंतु ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखण्यात येणारे मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मनोहर जोशी यांच्या डावपेचांना प्रत्यक्षात उतरवून विश्वासरावांना सपत्नीक हवाई मार्गाने संसद भवनात आणले. या कार्यक्रमाला प्रमोद महाजन हे जाणूनबुजून उपस्थित राहिले नसल्याचे सांगण्यात येते. कारण सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात आले तर भारतीय जनता पक्षाच्या मतांवर परिणाम होईल, असे त्यांना वाटत होते.
आज डॉ. अब्दुल कलाम, आदरणीय अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनोहर जोशी हे काळाच्या पडद्याआड गेले असले तरी सुभाष देसाई, कुमार कदम हे आजही या घटनेचे साक्षीदार असून चक्षुर्वैसत्यम हकीकत ते जाणतात. त्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खरोखरीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन्ही हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न किताब देण्याची आत्यंतिक इच्छा असेल (आणि गेल्या अकरा वर्षांत करु शकलेले नाहीत असे कार्य) तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी वळसे घेण्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानी ही मागणी घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात औचित्य साधावे, डॉ मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवक असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या दोन्ही हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न किताब देण्याची शिफारस करणारा ठराव मांडण्याबाबत गळ घालावी. डॉ मोहन भागवत यांचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खाली पडू देतील असे वाटत नाही. या कामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही सहकार्य करु शकतील. तूर्तास इतकेच !
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)