बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे चड्डी बनियन अंदोलन

0

७ जानेवारी २०२६ रोजी आझाद मैदानावर करणार यल्गार

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्ट च्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून आझाद मैदान येथे चड्डी बनियान आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती सेवानिवृत्त बेस्ट अधिकारी कर्मचारी संघर्ष समितीचे नेते भाई पानवडीकर यांनी दिली.

ऑगस्ट २०२२ पासून कामगार अधिकारी यांची हक्काची देणी ग्रॅच्युइटी व अंतिम देयके अजून दिलेली नाहीत. १०० ते १५० कामगारांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांची ही देणी अद्याप त्यांच्या वारसांना मिळालेली नाहीत. तर काही कर्मचारी हे मुंबईत ‘भीक मांगो आंदोलन’ करीत आहेत. अशी बिकट अवस्था बेस्टच्या सेवा निवृत्त कामगारांची झालेली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना लेखी निवेदने आणि पत्र दिलेली आहेत परंतु सरकार अद्याप यात तातडीने लक्ष घालत नाही.

आम्ही गेली ३० ते ३५ वर्षे या मुंबईच्या जनतेची अहोरात्र सेवा केली आहे. २००५ मध्ये मुंबईची अतिवृष्टीने तुंबई झाली असताना, २०२० मध्ये करोना काळात, मुंबईत १९९३ मध्ये दंगल झाली असतांना, अशा अनेक आपत्कालीन वेळी बेस्ट चे कामगार, अधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली आणि आज या कामगारांना आपल्या हक्काची देणी मिळण्यासाठी ‘चड्डी बनियन मोर्चा आंदोलन’ करावे लागत आहे, ही या सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. हे सर्वं ज्येष्ठ कामगार आहेत. सर्व भूमिपुत्र, मराठी कामगार आहेत ही सत्य परिस्थिती आहे. लोक अदालत आणि मा. उच्च न्यायालयाने देखील कामगारांना ताबडतोब देणी देण्यासंबंधी निर्णय दिला आहे. परंतु राज्य शासन आणि मुंबई महापालिका आयुक्त, मनपा कायदा १८८८ मध्ये तरतूद असून देखील जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला कोणी न्याय देइल काय ? असा संतप्त सवाल हे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.