बालपणीचा कोकणातील ‘लाल परी’ प्रवास…

0

बालपणी कोकणात जाण्यासाठी केलेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास आजही अंधुकसा का होईना, पण मनात खूप जिवंत आहे.
१९८२–८३ च्या सुमारास… माझं वय साधारण ७–८ वर्षांचं. आई, आजी आणि आत्या यांच्यासोबत कोकणातील दापोलीकडे निघालेलो तो प्रवास आजही आठवतो. त्या काळी आम्हाला वाटायचं—कोकणात पोहोचवण्याची ताकद जर कोणात असेल, तर ती फक्त एस.टी.ची लाल परी! जणू देवाने प्रवासासाठी खास तयार केलेलं साधन.

बसच्या खिडकीतून दिसणारं जग म्हणजे त्या काही तासांसाठी चालणारा एक सुंदर चित्रपटच असायचा. मुंबई मागे पडताच रस्त्याच्या कडेला धावणारी झाडं जणू आमच्याबरोबर शर्यत करीत आहेत, असं वाटायचं. लाल मातीचे रस्ते, हिरवीगार शेतं, नांगराला जुंपलेली बैलजोडी… सगळं काही डोळ्यांत साठवून जायचं.

सकाळचा प्रवास असेल तर सूर्योदय आणि संध्याकाळचा असेल तर सूर्यास्त. सूर्य उगवतो, डोक्यावर येतो आणि हळूहळू क्षितिजाच्या पलीकडे हरवतो—निसर्गाची ही जादू बालमनाला खूपच मोहवून टाकायची.
कधी कधी रात्रीचा प्रवासही व्हायचा. ड्रायव्हरच्या समोरील काचेतून दिसणारा अंधारातला रस्ता… घनदाट झाडांमधून वाट काढत धावणारी ती लाल परी… आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचे उघडझाप करणारे लाईटचे इशारे—हे सगळं तेंव्हा समजत नसले तरी पाहण्यातच वेगळा आनंद होता.

त्या प्रवासात आपण एखादे छोटे राजकुमार आहोत, अशीच भावना मनात असायची.
खिडकीतून येणारी थंड हवा… मातीचा गंध… पावसाच्या सरी…
आज स्वतःची एसी कार असली तरी तो अनुभव मात्र मिळत नाही. कारण पॉवर विंडो असलेल्या गाडीत पावसाचे थेंब आत येत नाहीत… आणि मनालाही तितकी मोकळीक मिळत नाही.
माझ्या या छोट्याशा लिखाणातून तुम्हीही क्षणभर तुमच्या बालपणात जाऊन आला असाल अशी आशा आहे.
तुमच्याही अशा एस.टी.च्या प्रवासाच्या आठवणी असतील तर नक्कीच सर्वांना सांगा…कदाचित पुन्हा एकदा आपलं बालपण आपल्याला मिळेल !
✍️ -राकेश गजानन वायंगणकर, बोरीवली, मुंबई.9004973988. (लेखक बोरीवली पूर्व येथील वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लब चे सर्वेसर्वा आहेत)

Leave A Reply

Your email address will not be published.