बालगंधर्व संगीत महोत्सवाची आजपासून द्वितपपूर्ती वारी स्वरोत्सवाची..

0

पहिले पुष्प शास्त्रीय गायन व सतार वाद्याने होईल सुरवात…

जळगाव |- बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी केले आहे. २४ वा अर्थात द्वितपपूर्ती महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात रोज संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होईल. सन २०२५-२६ हे वर्ष स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून प्रतिष्ठान साजरं करीत आहे.

महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व संस्कृती मंत्रालय भारत सरकार रतनलाल सी बाफना ज्वेलर्स असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि., दाल परीवार, वेगा केमिकल्स प्रा. लि. न्युबो टेक्नॉलॉजीस, चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य असणार आहे. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आले आहे.

प्रथम दिन – प्रथम सत्रात श्रुती बुजरबरुआ ह्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायिका तसेच पार्श्वगायिका असून शुद्ध शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, मराठी अभंग, भजन, गझल इत्यादी उपशास्त्रीय संगीतप्रकारांमध्येही त्या आपल्या सुमधुर स्वरांची छटा उलगडतील.

प्रथम दिनाच्या द्वितीय सत्रात चिराग कट्टी सतार वादन करतील. चिराग कट्टी हे आजच्या काळातील भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिभावान व आशादायी तरुण सतारवादक म्हणून व्यापकपणे ओळखले जातात. त्यांच्या सादरीकरणातील तरुणाईची उर्जा, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि ताजेपणा यांमुळे त्यांच्या संगीतामध्ये परंपरेची खोल मुळे आणि आधुनिकतेचा स्फूर्तिदायक स्पर्श यांचा सुंदर संगम दिसून येतो.

१० जानेवारीला सारंगी वादनासोबत कथक जुगलबंदी..

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रथम सत्र उस्ताद सबीर खान सारंगी वादन करतील. “मीर अकासा” या ११व्या शतकापर्यंत मागोवा असलेल्या, थोर संगीतपरंपरेतून आलेल्या कुटुंबातील बालप्रतिभावान कलाकार आपली कला सादर करतील. भारतीय संगीतविश्वातील नामांकित तबलावादकांमध्ये सबीर खान हे सर्वांत तरुणांपैकी एक मानले जातात. वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षीच त्यांच्या विलक्षण तंत्रदक्षतेने, नादसमृद्धीने, उत्कृष्ट स्वरगुणवत्तेने आणि परिपक्वतेने कोणत्याही रसिकाला व जाणकाराला थक्क केले आहे. दुसऱ्या दिवसाच्या द्वितीय सत्रात निधी प्रभू व कुणाल ओम यांची कथक – फ्लेमेंको जुगलबंदी सादर करणार आहेत. कथक नृत्यांगना असून आपल्या जोशपूर्ण सादरीकरणांसाठी, अभिनव नृत्यरचना आणि निष्ठावान अध्यापनासाठी प्रसिद्ध आहेत. गुरू डॉ. मंजीरी देव आणि गुरू पं. मुकुंदराज देव यांच्याकडे १९ वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना सुप्रसिद्ध पं. बिरजू महाराजजी व विदुषी सस्वती सेनजी यांच्याकडूनही शिकण्याचा लाभ मिळाला असून त्यांच्या नृत्यकलेचा आविष्कार जळगावकरांना अनुभवता येईल. कथक – फ्लॅमेन्को यांचे सुंदर सादरीकरण होईल. त्यांच्यासोबत कुनाल ओम हे भारतातील असे कलाकार आहेत, ज्यांना त्यांच्या उत्कटतेमुळे, समर्पणामुळे, चिकाटीमुळे आणि त्यांनी साकारलेल्या अत्यंत यशस्वी व प्रशंसनीय फ्युजन कामासाठी जगभरातील फ्लामेन्को समुदायात मान्यता मिळाली आहे. भारत आणि स्पेन या दोन देशांमधील सांस्कृतिक दुवे मजबूत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. उत्तर भारतातील कथक नृत्य, राजस्थानचे लोकसंगीत, सूफी आणि कव्वाली यांच्यासोबत केलेली त्यांची फ्लामेन्को संमिश्र सादरीकरणे ही त्यांच्या अद्वितीय संकल्पना असून, अशा प्रकारचे सांस्कृतिक फ्युजन आणि मनोरंजन सादर करणारे ते जगातील पहिले भारतीय कलाकार आहेत.

११ जानेवारीला शास्त्रीय गायनासोबत व्हायोलीन वादन..

महोत्सवाच्या शेवट्या दिवशी पहिल्या सत्रात यशस्वी सिरपोतदार यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची अनुभूती घेता येईल. तर दुसऱ्या सत्रात श्रेया देवनाथ व्हायोलीन वादन तर जी.जीवा हे ताविल वादन करतील. नादस्वरम् एम. कार्तिकेयन तर प्रविण स्पर्श यांचे मृदंगम वादनाची झलक बघायला मिळेल. यावेळी सुप्रसिद्ध सुसंवादिनी मंगला खाडीलकर काम पाहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.