काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ
मुंबई । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भंडारे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत थोरात यांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारे यांनी ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ अशी धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना कीर्तनकार भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली. भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. समोर बसलेल्या काही लोकांनी कीर्तनकारांशी हुज्जत घातली. यावेळी कीर्तनस्थळी मोठा गोंधळ उडाला होता.


कीर्तनकार भंडारे यांना रोखल्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनेने धर्माच्या नावावर मोर्चा काढला. यानंतर सोमवारी रात्री हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट मारण्याची धमकी दिली. संग्राम भंडारे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.