बदलापूर प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
ठाणे । बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची सफाई कर्मचारी नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं, तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं.
घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं. ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं.
यामुळे आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली. आंदोलक आक्रमक झाले. आंदोलनांनी रेल्वे स्थानकावर येऊन ट्रकवर उतरले. त्यांनी लोकल अडवली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. विरोधकांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. या प्रकरणाची तीव्रता पाहून शिंदे सरकारने एकापाठोपाठ एक तातडीने निर्णय घेऊन याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी पावले उचलत आहेत.