महसूल विभागात मोठी खळबळ उडणार; ‘हे’ बडे अधिकारी होणार बडतर्फ

0

मुंबई । महाराष्ट्र्रात सध्या गाजत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ बदली नाही, तर थेट बडतर्फ करण्याचा इशारा त्यांनी दिला.

शनिवारी नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, हे प्रकरण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणाचा विशेष तपास पथक (SIT) सखोल तपास करत असून कुणालाही वाचवले जाणार नाही. ज्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत, त्यांनी ते SITकडे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने अशोक खरातने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना त्रास देत त्यांच्या जमिनी बळकावणे, रस्ते अडवणे अशा प्रकारांचेही आरोप समोर आले आहेत. यावर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, या गैरप्रकारात सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. SITकडून नावे समोर आल्यानंतर संबंधितांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल.

याशिवाय, खरातच्या कार्यक्षेत्रातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाणार असून त्यामधून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, अंजली दमानिया यांच्याकडे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) कसे आले, या संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. दमानिया यांच्याकडे माहिती मिळवण्याची स्वतंत्र यंत्रणा आहे, असे सांगत मुख्यमंत्री कार्यालय अशा संवेदनशील प्रकरणात माहिती देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दमानिया यांनी आपल्याकडील माहिती SITकडे द्यावी, असेही त्यांनी म्हटले.

तसेच शिर्डी परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन सावकारीच्या माध्यमातून बळकावल्याच्या तक्रारींबाबतही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. पीडित शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास तो स्वतःच्या न्यायालयात स्वीकारून त्यांना न्याय देण्याची जबाबदारी महसूलमंत्री म्हणून आपण घेऊ, असे त्यांनी आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.