सुरांचा अमूल्य ठेवा हरपला; ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
भारतीय संगीतविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ज्येष्ठ गायिकेने मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या दादर शिवाजी पार्कात सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला होता. आशा भोसले यांची गणना बॉलिवूडच्या दिग्गज गायकांमध्ये केली जाते. आजवर त्यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. संगीताच्या इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील आशा यांच्या नावावर आहे.
त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ही भरून न निघणारी हानी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आठवणी आणि गाणी मात्र कायम रसिकांच्या मनात जिवंत राहतील.