प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार
कौशल्य व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ; सोहळ्यात मान्यवरांची लाभली उपस्थिती
जळगाव, प्रतिनिधी – व्यापार उद्योग करणारा जैन समाज ज्ञानाचीही पूजा करतो हे कौतुकास्पद आहे. मला मिळालेला पुरस्कार अनुभूती स्कूलच्या वतीने स्वीकारत आहे. जळगाव येथील भवरलाल कांताई फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही समाजाकडून मिळालेले समाजाला अर्पण करतो. असे प्रतिपादन अशोक जैन यांनी केले. ते नाशिक येथील जैन श्वेतांबर स्थानक वासी श्री संघ आणि प.पू. प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे कौशल्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
येथील जैन श्वेतांबर स्थानक वासी श्री संघ आणि प.पू. प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. काल रविवारी (दि.२७) सकाळी कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात हा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासाध्वी परमपूज्य किरणसुधाजी यांनी आपल्या अत्तचनाने सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन व अनुभूति निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अनुभूति निवासी स्कूलला कौशल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक के भार. बेदमुथा, विशेष प्रमुख पाहुणे आ. प्रशांत बंब उपस्थित होते, कार्याध्यक्ष जे.सी. भंडारी यांनी स्वागत करून देणगीदारांविषयी माहिती दिली.
फंडाचे अध्यक्ष विजय बेदमुथा यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, या उपक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. ४८ वर्षे गुणवंत गौरव सोहळा अखंडपणे सुरू आहे. सचिव अॅड. विद्युल्लता तातेड यांनी अहवाल सादर केला.
शिक्षण कौशल्य पुरस्कार प्रदान केल्यावर मनोगत व्यक्त करताना अशोक जैन यांनी अनुभूती शाळेत भारतीय संस्कृती केंद्रबिंदू मानून संस्कार केले जातात. देशातील पहिल्या ५ शाळात असून महाराष्ट्रातील निवासी शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. २० टक्के गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते असे नमूद केले. आ. प्रशांत बंब म्हणाले, स्वातंत्र्यानंतर शेती आणि शिक्षण याकडे दुर्लक्ष झाले. आज राज्याच्या बजेटमध्ये शिक्षणावर व शिक्षकांच्या पगारावर खूप मोठा खर्च केला जातो. जैन इरिगेशनतर्फे शेतीसाठी योगदान देण्याबरोबरच कार्याद्वारे सातत्याने समाजसेवा केली जाते. जैन समाजातील प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस शैक्षणिक कार्यासाठी, समाजोपयोगी सेवेसाठी द्यावा असे आवाहन आ. बंब यांनी केले, तसेच त्यांनी शिक्षण फंडासाठी देणगी जाहीर केली.
अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी ही भारत देशाचे भविष्य आहे, मुलांकडे उपजत असलेले ज्ञान, किमान कौशल्य असलेले गुण यांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने अधिकाधिक उपयोग होणे आवश्यक आहे, कारण विविध क्षेत्रात होत असलेला ए.आय.चा वापर हा सर्वांसाठी एक आव्हानात्मक भाग असून आहे ज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीच्या ज्ञानदालनाचा अभ्यास करता लक्षात येते की, नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांनी संस्कारशील आणि कर्तबगार पिढ्या घडविल्यात. ज्ञानाचं हेच सांस्कृतिक संचित घेऊन अनुभूतीच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात झाली. सर्वांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभूतीची अनुभूती घ्यावी असे नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष के. आर बेदमुथा यांनी या फंडाची ४८ वर्षांपूर्वी स्थापना केली असल्याचे सांगून बेदमुथा इंडस्ट्रीज ४ हजार तरुणांना रोजगार देते व कररूपाने देशाला योगदान देते याकडे लक्ष वेधले. कौशल्य पुरस्कार हा स्व. कौशल्याबाई मोहनलाल बलदोटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. कन्हैयालालजी बलदोटा नाशिक यांच्यातर्फे दिला जातो. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी गौरव बलदोटा, राहुल बाफणा, राहुल चोपडा, अजित सुराणा, मोहनलाल लोढा, सीए. अरुण बुरड, डॉ. कन्हैयालाल बलदोटा, वर्धमान लुंकड, चंपकलाल पारख, जक्रीलाल धीया, लता लुणावत, शोभा बोरा, संजय छोरीया, नेमीचंद तातेड़, मधुबाला कटारीया, राजेश कोटेचा (पुणे), प्रफुल बाफना, प.पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड उपाध्यक्ष लखमीचंद पारख, ब्रिजलाल कटारीया, विनोदजी बेदमुथा, खजिनदार ललित मोदी, सहसचिव हेमा लुंकड, राजेंद्र इंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष शैक्षणिक पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्दी प्रमुख प्रा. लोकेश पारख यांनी केले.
अशोक जैन यांच्याकडून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी भरघोस मदत
भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन व गांधी रिसर्च फाऊंडेशनला विविध संस्थांकडून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम आणि त्यात अधिक रक्कमेची भर घालून ती त्या संस्थेसाठी देण्यात येते. त्याचप्रमाणे कौशल्य पुरस्काराच्या अकरा हजार रुपयांच्या रकमेत भरघोस रक्कम देण्याची घोषणा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली. सदर रकमेचा विनीयोग प्रितीसुधाजी शिक्षण फंडाच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी करण्यात येणार आहे.