माध्यमिक वेतन पथकाच्या कारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण : जिल्हाधक्ष बापु दाभाडे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून मा.जिल्हाधिकारी यांना माध्यमिक वेतन पथकांच्या कारभाराविषयी निवेदन देण्यात आले आणि मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर २८ एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा निवेदन देण्यात आला.यावेळी ३०शिक्षक आमरण उपोषणास बसणार आहेत त्यात विशेषतः पाच महिला शिक्षक भगिनी ही आहेत. सांगली माध्यमिक वेतन पथकाकडून शासनाचा दप्तर दिरंगाई व झिरो पेंडन्सी कायदा आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचा दिनांक ३मार्च २०२२ व २०जुलै २०२३ रोजीच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय व थकीत बिले काढली जात आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय व थकीत बिले जाणूनबुजून चार-पाच वर्षे न काढण्या मागचे गोडबंगाल शोधण्याची गरज आहे. वेतन पथकाच्या या कारभाराविषयी अनेक शिक्षकांच्या लेखी तक्रारी जुनी पेन्शन संघटनेला प्राप्त झालेल्या आहेत.वेतन पथकाचा कारभार मनमानी, हुकूमशाही आणि बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे. अशा बेकायदेशीर पद्धतीने कारभार करणाऱ्या सांगली माध्यमिक वेतन पथकातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून, त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच पाच ते सहा वर्षांपासून थकीत बिले जी वेतन पथकाच्या भोंगळ कारभारामुळे राहिलेले आहेत, त्या सर्व बिलासाठी पुन्हा एकदा ऑनलाईन टॅब उपलब्ध करून सर्व थकीत बिले मंजूर करण्यात यावीत. अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापु दाभाडे यांनी केली आहे.यापूर्वीही शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांना दिनांक २७/०३/२०२५ रोजी माध्यामिक वेतन पथकाच्या वरील कारभाराविषयी निवेदनाव्दारे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.वेतन पथकातील कर्मचाऱ्याच्या कारभाराची योग्य ती चौकशी न झाल्याने *दिनांक २८ एप्रिल २०२५पासून सकाळी ठीक १० वाजल्यापासून मा.जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असे आज मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी मनपा अध्यक्ष मा. इम्रान मुजावर सर,जिल्हा सचिव मा. कलीम नदाफ सर,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन इंगोले सर, जिल्हा उपाध्यक्ष लाखन मकानदार सर, जिल्हाध्यक्ष बापु दाभाडे सर, उपोषणकर्ते शिक्षक व संघटनेचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते.