अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात लावणीचा ठेका; ‘वाजले की बारा’मुळे वादाची ठिणगी
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात लावणी नृत्य सादर झाल्याने नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. रविवारी गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी लावणी सादर केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, लावणी ही महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे आणि यात काहीही चुकीचे नाही. “सर्व महिलांनी नृत्य केले, त्या कलाकार आहेत. अनेक ठिकाणी, अगदी मुख्यमंत्र्यांसमोरही लावणी सादर होते. यात गैर काही नाही,” असे त्यांनी एका मराठी वृत्त वहिनीला बोलताना म्हटले. शिल्पा शाहीर या पक्षाच्या पदाधिकारी असल्याचेही स्थानिक नेत्यांनी नमूद केले.


पक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे,की लावणीच्या कार्यक्रमांसाठी..
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात लावण्यांचा कार्यक्रम.. pic.twitter.com/Nz6zIRiXGb
— 🚩सिध्देश पाटील🚩 (@Sagarpa31447100) October 27, 2025
शिवाय हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्याचं जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यातून त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टकण्याचा प्रयत्न केला आहे. पण याबाबत मात्र बाहेर चुकीचा संदेश गेला असल्याचं ही बोललं जात आहे. पक्ष कार्यालयात लावणी सादरीकरणामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, आणि यामुळे राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.