८ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन ; नागपुरात धडकणार ३३ मोर्चे
नागपूर । राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कामाला वेगाने सुरूवात झाली असून हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाला देखील वेग आला आहे. नागपूरमधील रविभवन परिसरातील कॅबिनेट मंत्र्यांचे निवासाची व्यवस्था असलेल्या बंगल्यांची डागडुजी, रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. हे हिवाळी अधिवेशन विविध कारणांमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थानापासून विधिमंडळ परिसर असलेल्या सिव्हिल लाईन्स भागात पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ८ डिसेंबरपासून नागपुरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ३३ मोर्चे धडकरणार आहेत. २२ संघटनांनी धरणे आंदोलन तर १७ संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली आहे.


शासकीय सुट्या; तरीही कामकाज होणार
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. आणखी मोर्च्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिवेशनात काय चर्चा होते, हे पाहणे देखील अत्यंत महत्वाचे असणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर असा एकूण सात दिवसांचा असणार आहे. शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहाचे कामकाज होणार असल्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यंदा अधिवेशनाचा कालावधी ८ दिवसांचा असले तरीही राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. यामध्ये उपायुक्त स्तरावरील १० अधिकारी , सहाय्यक उपायुक्त ३४ अधिकारी, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक २०० अधिकारी, २१०० पोलिस अंमलदार टप्प्याटप्याने शहरात दाखल होत आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.