दुचाकी व एसटी बसच्या भीषण अपघातात जळगावातील ‘महाबासुंदी चहावाला’ तरुण ठार

0

यावल । दुचाकी व एस.टी. बसच्या भीषण अपघातात जळगावातील दुचाकीस्वार तरुण ठार झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना यावल तालुक्यातील पाडळसे गावाजवळ असलेल्या मोर नदीच्या पुलाजवळ घडली.मयूर श्रीराम गवळी (३२, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) असं मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमींना भुसावळ उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ गुळाची ‘महाबासुंदी’ नावाने चहा विक्रीचा व्यवसाय करणारे मयूर अण्णा गवळी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रविवारी ते आपले मित्र जयेश पाटील आणि गोयर यांच्यासोबत दुचाकीवरून बामणोद येथे गेले होते. तेथून परत येत असताना रस्त्याच्या वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मयूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या अपघातात जखमी झालेल्या जयेश पाटील आणि गोयर यांना तात्काळ भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मयूर गवळी हे जळगावात ‘महाबासुंदी’ चहा विक्रेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मनमिळाऊ, हसतमुख स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच अनेक नातेवाईक, मित्र आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. मयूर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.