एरंडोल जवळ भीषण अपघातात एक ठार तीन जखमी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. ज्यात शिर्डीवरून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असताना मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडली आहे. अपघातानंतर मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय ४६) हे पत्नी रुपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता मुक्ताईनगरकडे परतत होते. त्यावेळी एरंडोल ते जळगाव दरम्यान नॅशनल हायवेवर यूपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने (WB-23-F9472) त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला (MH-19-CQ-7009) रस्त्यावर अचानक मागून धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतरका भीषण होता, की अपघातात राजेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुलं – खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतलं. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केलं. त्याचवेळी तीन मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. फिर्यादी राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या दुखापतीस कंटेनर चालकच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं.