उत्तर प्रदेशात धरणगाव तालुक्यातील भाविकांच्या बसला अपघात ; एकाच मृत्यू, अनेक जखमी

0

जळगाव । आज शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील कुरेभर चौकात एक भीषण रस्ता अपघात झाला. यात जळगावच्या धरणगाव तालुक्यातील कल्याने खुर्द येथील यात्रेकरूंना घेऊन अयोध्याहून परतणाऱ्या एका खाजगी पर्यटक बसला एका भरधाव ट्रेलरने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आणि स्थानिकांनी तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याने खुर्द येथील तब्बल 30 महिला आणि 5 पुरुष अशा 35 जणांच्या ग्रुपने जळगावहून रेल्वेने काशी येथे प्रवास केला. तेथून अयोध्याकडे पुढील दर्शनासाठी खाजगी वाहनाने जात असताना सुलतानपूरमध्ये मागून येणाऱ्या एका वेगवान ट्रेलरने बसला धडक दिली.

या अपघातानंतर बस आणि ट्रेलर रस्त्यावर उलटले. बस उलटल्यानंतर अनेक प्रवासी आत अडकले. जखमींना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी दरवाजे आणि खिडक्या तोडत बाहेर काढले. गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कुरेभर सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) हलवण्यात आले.

या भीषण अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले असून काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि धरणगाव प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. फिरायला गेलेल्या सर्व नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात स्थानिक प्रशासनासोबत संवाद सुरू आहे. या घटनेमुळे कल्याने खुर्द गावात हळहळ व्यक्त होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.