जळगावात भरधाव डंपरची ट्रॅक्टरला धडक, एक तरुण जागीच ठार

0

जळगाव । जळगाव शहरात अपघातांची मालिका अजून सुरूच असून अशातच आज शनिवार दि. २५ जानेवारी रोजी विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळघडली.

अंकुश आत्माराम भिल (वय-२७, रा. डिकसाई ता. जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई-वडील पत्नी, भाऊ, २ मुले, १ मुलगी यांच्यासह राहत होता. हातमजूरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन) शनिवारी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २९०६) ने अंकुश भील याच्यासह सुनील मधुकर भिल (वय-२२), गणेश भगीरथ भिल (वय-१८), आणि शुभम सुका भिल (वय -२०, तिघे रा. विदगाव ता. जळगाव) विटा घेऊन जात होते.

जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून जात असताना तेथील वळण जवळ मागून येणाऱ्या भरधाव डंपरने ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला धडक दिली. तेवढ्यात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल, गणेश भगीरथ भिल, शुभम सुका भिल हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रुग्णालयात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने व ३ मुले पितृप्रेमाला पोरकी झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.