लाडकी बहीण योजनेच्या eKYCसंदर्भात सरकारची मोठी घोषणा
मुंबई । राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्याला आळा घालण्यालाठी ईकेवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र केवायसी करूनही अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही.
लाभार्थ्यांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यावर आता राज्य सरकारने यावर तोडगा काढला आहे.महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर आता पुन्हा आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. त्याव कॉल करून त्यांच्या कोणत्याही शंकांचं निरसन करण्यात येणार आहे.
आदिती तटकरेंची पोस्ट
आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत.या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.
तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती,” असं त्यांनी सांगितलं आहे.दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आता महिलांना जर काही अडचणी आल्या तर त्यांना हेल्पलाइन नंबरवर फोन करून तक्रारीचे निवारण करता येणार आहे.