जेंव्हा बाळासाहेब ठाकरे हे कलमाडींना ‘बेडका’ची देतात उपमा !

0

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या संदर्भात बरेच लिखाण प्रसिद्ध झाले आहे. परंतु काही गोष्टी पुढे आणणे आवश्यक वाटते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्रातील शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या शिवशाही सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून ओळखले जात. शिवसेना नेते डॉ. मनोहर गजानन जोशी हे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. अभिनेते नाना पाटेकर हे प्रिन्सिपॉल मनोहर जोशी यांचे विद्यार्थी.

या नात्याने जोशी पाटेकर यांचे घनिष्ठ संबंध. सुरेश कलमाडी आणि नाना पाटेकर यांची मैत्री होती. राज्यसभेसाठी सुरेश कलमाडी यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची होती. यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मन वळविणे महत्त्वाचे होते. मनोहर जोशी हे राजकारणातील चाणक्य. नाना पाटेकर हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मनोहर जोशी सरांना भेटायला आले. मी सामनासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ प्रतिनिधी या नात्याने हे वृत्त घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलो होतो. नाना सरांना भेटून बाहेर येताच आम्ही पत्रकारांनी त्यांना घेरले.

नानांनी स्पष्टपणे सांगितले की सुरेशभाई कलमाडी राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत त्यांना शिवसेना भाजप युतीचा पाठिंबा हवा असल्याने मी सरांकडे रदबदली करायला आलो होतो. झाले. मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मन वळविले. बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी मुंडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन कलमाडी यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांनी परखडपणे सांगितले की, आम्ही दिलाय खरा कलमाडीना पाठिंबा पण हा बेडुक टुण्णकन उडी मारुन पलिकडे गेला तर काय घ्या.‌

दलबदलूंच्या राजकारणावर हा बाळासाहेब ठाकरे यांच्या खास शैलीतील तडाखा होता. सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री असतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणाऱ्या सर्वांनाच धक्का दिला. ब्रिटिशांच्या काळात बोरीबंदर ते ठाणे ही सर्वात पहिली रेल्वेगाडी सुरु करण्यात जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ यांचा महत्वाचा वाटा होता. म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात बोरीबंदर म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस या मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकाला जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देण्यात यावे, असे होते. परंतु रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव मार्च १९९६ मध्ये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

१९९५-१९९६ या काळात पामलू वेंकट उर्फ पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांवाला सर्वांचीच संमती मिळाली. नंतर मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या मुख्य स्थानकाला जगन्नाथ शंकरशेठ यांचे नांव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई यांच्या पासून अनेकांनी संसदेत आवाज उठविला. परंतु केंद्र सरकारकडून अद्याप जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचे नांव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. निवडणुका समोर दिसताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणारे सरकार केंव्हा निर्णय घेणार हे त्यांचे त्यांनाच माहीत.

-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

Leave A Reply

Your email address will not be published.