भुसावळच्या किन्ही एमआयडीसीत ३० हजार लिटर संशयास्पद ‘इंधन’ साठा जप्त !
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘नमो एनर्जी’ या कंपनीत भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार लिटर संशयास्पद इंधन जप्त करण्यात आले आहे.
साठवणूक व इंधनाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, प्राथमिक तपासात नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जप्त इंधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे भेसळखोर आणि ऑईल माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.


गुप्त माहितीनुसार तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या आवारात धडक दिली.
घटनास्थळी जी.जे. २४ – व्ही. ७६५५ (GJ 24 V 7655) क्रमांकाचा टँकर उभा असल्याचे आढळून आले. पथकाने टँकरच्या कॉकमधून द्रव पदार्थ काढून पाहणी केली असता, त्याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी उपस्थित कंपनी मालकाचे भाऊ अमीन इक्बाल तेली (रा. सुरत) यांची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. हा टँकर ट्रान्सपोर्टचा असून तो भाडे करारावर आणल्याचे सांगण्यात आले, मात्र चालक जागेवर नव्हता.
अधिकाऱ्यांनी जागेवरच टँकरमधील इंधनाची घनता (Density 712) आणि तापमान (Temperature 20) मोजले. हा पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल, याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत (CA) पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (७० रुपये प्रति लिटर दराने) असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा टँकर आता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे, शिर्डी उपनिरीक्षक रवी नरवडे हवालदार उमाकांत पाटील गोपाळ गव्हाणे रतन परदेशी विकास सातदिवे राहुल वानखेडे आणि तालुका पोलीस स्टेशनचे पथकाने केली. पंच म्हणून तलाठी मनीषा बरडिया आणि प्रमोद ठोसर उपस्थित होते.