अनुभूती निवासी स्कूलमध्ये ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स स्पर्धा 

0

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते होईल उद्घाटन; राष्ट्रीय योगासना स्पर्धेत भारतातून ३४ संघाचा सहभाग

जळगाव |  अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स आयोजीत करण्यात आले आहे. दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय योगासना स्पर्धेत संपूर्ण भारतातून ३४ संघ सहभागी झाले असून उद्घाटन (उद्या) दि. १७ रोजी सकाळी ८.३० वाजता अनुभूती स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे होईल. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास उपस्थित असतील. सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, विभागीय स्पोर्टस समन्वयक सिद्धार्थ हेही यावेळी उपस्थित असतील.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे अधिकृत सीआयएससीई बोर्डच्या १७ वर्षांखालील मुलींच्या शालेय ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स साठी अनुभूती निवासी स्कूल हे मुख्य आयोजक आहेत. १७ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा, मुलींची फुटबॉल व तायक्वांडो स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यानेच संपूर्ण भारतातून अनुभूती स्कूलला राष्ट्रीय योगासना स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यातून विजयी असलेले ३४ संघ १६७ खेळाडूंसह सहभागी होणार आहेत. प्रत्येक खेळाडूला दिलेल्या वेळेत उत्तम सादरीकरणातून खेळाडूंनी राष्ट्रीय योगासना स्पर्धेत मजल मारली आहे.

आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या चार प्रकारात योगासनाची विविध आसने सादर केली जातील. सेमी फायनल व फायनल नंतर प्रत्येक प्रकारातील विजयी खेळाडूंना गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ अशी तीन पारितोषीके देण्यात येणार आहे. तसेच मुल्यांकनानुसार जास्तीत जास्त विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या संघाला चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून डॉ. आरती पाल, एसजीएफआयचे रितू पाठक हे मुख्य निरीक्षक असतील. पंच म्हणून चैताली मुखर्जी, रितीका, सरिता मौर्या, तुलिका रॉय, डॉ. चेतनकुमार भागवत, डॉ. चाली राजा, संजय देशमुख, छाया मिरकर, कविता सावंत, डॉ. श्रद्धा व्यास, डॉ.शरयू विसपूते, राहूल खरात काम पाहतील.

या संघांचा सहभाग

आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, सीबीएसई वेल्फअर स्पोर्टस, सीबीएसई, चंदीगड, छत्तीसगड, (सीआयएससीई) कौन्सील बोर्ड, दादर व नगर हवेली, दमण व दीप, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळा क्रीडा संघटना, आयपीएससी स्कूल, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केंद्रीय विद्यालय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, नवोदय विद्यालय, ओडिशा, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपूरा, उत्तर प्रदेश, विद्याभारती, पश्चिम बंगाल या संघांचा योगासना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.