जळगाव महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा उडाला धुव्वा.. महायुतीचेच वर्चस्व
जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या ७५ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६३ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. यानंतर आज या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली असून या निकालामध्ये महायुतीचेच वर्चस्व दिसून आले आहे. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपने ४७, शिवसेना शिंदे गटाने २३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पैकी भाजपने ४७ पैकी ४५ जागांवर विजयी आघाडी घेतली असून, दोन ठिकाणी पुन्हा मतमोजणी केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटाला देखील २३ पैकी २२ जागांवर विजयी आघाडी मिळाली असून, एका जागेचे नुकसान सोसावे लागले आहे. याशिवाय, अजित पवार गटाचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले आहेत. टपाली मतमोजणी सुरू झाल्यापासून महायुतीच्या सर्व उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली होती, ती अखेरपर्यंत कायम राहिली.