संभाजीनगरमध्ये शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा हादरा! एमआयएम…
संभाजीनगर । महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरु असून दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा गड मानला जातो, मात्र यावेळी या महापालिकेत कमळ फुललं आहे. तर दुसरीकडे एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला आणखी एक गड गमावला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार छत्रपती संभाजीनगरात भाजप तब्बल 23 जागांवर आघाडीवर आहे. तर एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली असून, एमआयएमचे उमेदवार 15 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देखील 15 जागांवर आघाडीवर असून, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केवळ 8 जागांवर आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीला देखील या महापालिकेत चांगलं यश मिळालं आहे, वंचित बहुजन आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगर हा सुरुवातीपासून शिवसेनेचा गड मानला जातो. यावेळी मात्र या गडाला भाजपानं सुरुंग लावला आहे.