मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जळगाव शहराच्या विकासाचा आराखडा सादर

0

जळगाव । महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी महायुतीच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत जळगाव शहराच्या विकासाचा आराखडा सादर केला.

राज्य सरकारच्या निधीतून गेल्या पाच वर्षांत जळगाव शहरात रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांसाठी शेकडो कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जळगाव महापालिकेला शासनाकडून काही वर्षांपूर्वी ५० कोटीही मिळत नव्हते. मात्र, आता जळगावात हजारो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरू असून, शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. जळगावकरांच्या आशीर्वादाने आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल आणि महापौरही महायुतीचाच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आगामी काळात विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात उद्याने, पाणी पुरवठा व्यवस्था, अंतर्गत व प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येईल. याशिवाय जळगाव परिसरात उद्योग आणण्यावरही भर देण्यात येणार आहे. जळगावला राज्य सरकारने आधीच विशेष दर्जा दिला असून, त्यामुळे उद्योगांना पोषक वातावरण निर्माण होईल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

विशेष बाब म्हणजे जळगाव महापालिकेवरील संपूर्ण कर्ज राज्य सरकारने यापूर्वीच फेडले असून, असे उदाहरण संपूर्ण राज्यात यापूर्वी कधीही घडले नव्हते. जळगावला पुढील पाच वर्षांत विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा संकल्प महायुतीने केला असून, त्यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.