जळगावमध्ये महायुतीचाच बोलबाला; मतदानापूर्वीच भाजपचे 6, तर शिंदेसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध
जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढणाऱ्या भाजपसह शिवसेनेची (एकनाथ शिंदे) घोडदौड उमेदवारी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. जळगाव महापालिकेत ७५ जागांपैकी महायुतीचे १२ जागा बिनविरोध निवडून आले आहे. ज्यामध्ये भाजप ६, तर शिवसेना शिंदे गटाच्या ६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. या यशानंतर महापालिकेबाहेर भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला.
जळगाव महापालिकेत भाजपने उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून बिनविरोधाने खाते उघडलं होते. यानंतर काल गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निश्चित झाले. यानंतर आज शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी माघारीच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे शिवसेनेचे रेखा चुडामण पाटील हे बिनविरोध निश्चित झाले आहेत.


नंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ७ क मध्ये शेवटच्या अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल सुरेश भोळे यांचा विजय निश्चित झाला आहे. प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री भिकन हिवराळे यांनी दुपारी माघार घेताच बिनविरोध निवडीचे चित्र निश्चित झाले. यानंतर प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेचे सागर श्याम सोनवणे यांच्या विरोधात छाननीअंती ५ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली.
दुपारी भाजपाचे प्रभाग क्रमांक १६ अ डॉ. विश्वनाथ खडके, प्रभाग १३ क मध्ये वैशाली अमित पाटील, ७ ब अंकिता पंकज पाटील आणि शिवसेनेचे १९ ब मधून गणेश उर्फ विक्रम सोनवणे हे बिनविरोध निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. परिणामी, जळगाव महानगरपालिकेवर महायुतीचाच बोलबाला दिसून आला आहे. एकूण ६३ जागांसाठी आता निवडणूक लढवली जाणार आहे.