जळगाव महापालिकेबाहेर इच्छुकांसह समर्थकांची मोठी गर्दी
जळगाव । राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात तब्बल सात वर्षानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक होत असून सर्वच आजीमाजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे. काहींना उमेदवारी मिळाली आहे. तर काहींना अद्यापही उमेदवारी मिळाली नाही.
दरम्यान महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात राजकीय वातावरणाचा पारा कमालीचा वाढला असून सकाळपासूनच महापालिका प्रशासनाच्या वतीने अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे. त्यामुळे या शेवटच्या काही तासांत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह महापालिका आवारात मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावून रस्ता सुरक्षित करण्यात आला आहे. केवळ उमेदवार आणि अधिकृत व्यक्तींनाच आत सोडले जात आहे.
राजकीय वर्तुळात सध्या ‘एबी’ फॉर्मवरून मोठी धाकधूक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एबी’ फॉर्म देण्यात आले असून इतर राजकीय पक्षाकडून अद्यापही पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसाठी ताटकळावे लागत आहे. वरिष्ठांकडून कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कापला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.