सातारा जिल्ह्यात शिवेंद्रराजेंचा करिष्मा कायम; तब्बल ४२ हजार मतांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आला निवडून
लातूरमध्येही दिसली त्यांच्या नेतृत्वाची छटा
सातारा | मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. अमोल मोहिते यांनी तब्बल ४२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना चितपट केले आहे.


या निवडणुकीत श्री. अमोल मोहिते यांना ५७,५९६ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार श्रीमती सुवर्णादेवी पाटील यांना १५,५५६ मते मिळाली आहेत. हा फरक इतका मोठा आहे की, तो विधानसभा निवडणुकीत एखाद्या आमदारालाही लाजवेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे श्री. रामशेरसिंह नाईक निंबाळकर,सातारा येथे श्री. अमोल मोहिते, रहिमतपूर येथे सौ. वैशाली माने वाई येथे श्री. अनिल सावंत,म्हसवड येथे सौ. पूजा विरकर ,मलकापूर येथे श्री. तेजस सोनवणे ,मेढा येथे सौ. रूपाली वारागडे यांनी घवघवीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित केली आहे. या सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या फरकाने विजयी केले असून, सातारा जिल्ह्यात भाजपच्या विजयाचा झंझावात पाहायला मिळत आहे.
याचबरोबर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे श्री. संजय हलगरकर,रेणापूर येथे सौ.शोभा अकनगिरे,उदगीर येथे सौ.स्वाती हुडे,अहमदपूर येथे श्री.स्वप्नील व्हते यांनीही दणदणीत विजय मिळवत भाजपच्या यशात भर घातली आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा कौल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगितले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “सातारा जिल्ह्यासह लातूरमध्येही भाजपला मोठे यश मिळाले आहे. संपूर्ण राज्यात भाजपच्या विजयामागे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व, ठोस निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणे महत्त्वाची ठरली आहेत.”
ते पुढे म्हणाले, “लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही अत्यंत विश्वासाने लढलो. मोदीजींच्या नेतृत्वात जनतेने भाजपवर विश्वास दाखवत मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला असून, हा विजय म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवलेल्या विकासाच्या विचारांचा विजय आहे.”सातारा आणि लातूर जिल्ह्यातील या दणदणीत विजयामुळे राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक राजकारणावर पुन्हा एकदा ठाम शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे.