जळगावमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी
जळगाव । महापालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 तारखेला होईल. यासाठी राज्यात महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र याच दरम्यान जळगावात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक फिस्कटली आहे.
सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं शरद पवार गटाचे पदाधीकारी बैठकीतून बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. युतीची चर्चा फिस्कटल्याने शरद पवार गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष संग्राम सिंह राजपूत यांनी याबाबत माहिती दिली आहे.


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत “डोक्यात हवा गेली आहे” अशी टीका केली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर जागावाटपात अतिरेक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी काँग्रेस आणि मनसेसोबत स्वतंत्रपणे चर्चा सुरू असल्याचेही जाहीर केले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक एकमेकांवर आरोप करत असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेची दारे बंद झाल्याचेही जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे,