भडगावात शाळेत सुरक्षेअभावी नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात पडून मृत्यू
भडगाव । भडगाव येथून दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात इंग्लिश मीडियम शाळेत सुरक्षेअभावी नर्सरीतील दोन चिमुकली मुले नाल्यात पडून मृत्युमुखी पडली. या घटनेने संपूर्ण भडगाव शहर हळहळले असून मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बालके नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आदर्श कन्या शाळेतील नर्सरी वर्गात शिकणारे हे दोन चिमुकले विद्यार्थी खेळत असताना किंवा वर्गाबाहेर असताना शाळेच्या संरक्षक भिंतीवरून थेट जवळच्या नाल्यात कोसळले. नाल्याच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचे मृतदेह फुगून आल्यावर ही गंभीर घटना उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.


शाळेच्या या निष्काळजीपणावर पालक आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोका किंवा पुरेसा सुरक्षित कठडा नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा मुख्य आरोप केला जात आहे. या गंभीर निष्काळजीपणासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.