भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळला
जळगाव । शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आलीय. पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेसह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज मुंबईतील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
पुण्यातील भोसरी भूखंड बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात खडसे यांच्यासह त्यांची पत्नी आणि जावयाच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी तपास पूर्ण करून ११ ऑक्टोबर २०२३ रोजी तिघांवर दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. विशेष म्हणजे, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये खडसे यांना या प्रकरणात ‘क्लीन चीट’ दिली होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयात पुनर्तपासाची विनंती केली. न्यायालयाने पुनर्तपासास परवानगी दिल्यानंतर तिघांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणामुळे खडसे यांना मंत्रीपदही सोडावे लागले होते. या प्रकरणात खडसे यांनी मुंबईतील कोर्टात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाकडून हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.