बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशावर डल्ला; तीन जणांना अटक
जळगाव । जळगावातील अजिंठा चौफुलीवर बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये काढणाऱ्या तीन सराईत पाकिटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चोरून नेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत असे की, यावल येथील शेख कलीम शेख इसाक हे १ डिसेंबरला पत्नीच्या औषधोपचारासाठी जळगावातील रुग्णालयात आले होते. औषधे घेऊन घरी जाण्यासाठी ते जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १५ हजार रुपये रोख रक्कम हातचलाखीने काढून घेतली. हा प्रकार लक्षात येताच शेख कलीम यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.


गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, पथकातील अंमलदारांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.
या तपासात, हमीद अय्युब खान (वय २२, रा. अक्सा नगर, जळगाव), समीर खान अफसर खान (वय २२, रा. शेरा चौक, जळगाव) आणि शोहेब मेहमुद पटेल (वय २३, रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव) अशा तीन तरुणांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या तिघांनाही अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी फिर्यादींच्या पॅन्टच्या खिशातून चोरलेली संपूर्ण १५ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरातील पाकिटमारांच्या टोळीला मोठा दणका बसला आहे.